कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाने टाकले वाळीत
ठिकठिकाणी फाटलेले कपडे, केसांच्या झालेल्या जटा,कित्येक महिने अंघोळ नाही,प्रातर्विधी जागेवरच असल्याने शरीरातून येणारा दुर्गंध शरीराची अवस्था तशीच मनाचीहि.सामान्य माणसांच्या भाषेत वेडा, पागल, मनोरुग्ण ’ ती ’ किंवा ’ तो ’ शहरात ठिकठिकाणी नजरेस पडतात. मात्र कोणीही बोलण्यास धजावत नाही.कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत यांचे जास्तच हाल झाले.प्रशासन ही जबाबदारी स्विकारत नाही.कोरोनामुळे घाटीतील मनोरुग्ण वॉर्ड बंद आहे. त्यामुळे यांना वालीच उरलेला नाही.
मार्च महिन्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर मनपाद्वारे बेघरांसाठी विशेष मोहीम राबवली गेली. मात्र या बेघर मनोरुग्णांकरीता कोणीही पुढे आले नाही.लॉकडाऊनमध्ये सुरुवातीच्या काळात अन्नदात्यांच्या कृपेमुळे खाण्याचे जास्त हाल झाले नाही.मात्र नंतर कडक स्वरुपाच्या लॉकडाऊनमध्ये अन्नासाठी दाहिदिशा फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली.बसस्थानक,रेल्वे स्थानक,उड्डाणपूल अशा ठिकाणी बसलेले हे मनोरुग्ण दुसर्यांना नुकसान पोहेचवत नाही.मात्र समाजाने त्यांना वाळीत टाकले आहे.औरंगाबाद मध्ये मनोरुग्णांसाठी एकही स्वतंत्र विशेष रुग्णालय नाही.
किचकट प्रक्रियेमुळे सामान्य माणसे दूरच
शहरातील मनोरुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठीची प्रक्रीया अतिशय किचकट असल्याने सामान्य माणसे यापासून दूरच राहणे पसंद करतात.यामध्ये ज्या भागात मनोरुग्ण आढळून आला तेथील पोलीस स्टेशनद्वारे सदर रुग्णास जिल्हा सत्र न्यायालयात हजर करावे लागते, कुणाचाही आक्षेप नसल्यास न्यायालयाच्या परवानगीने मेडिकल टेस्ट करुन या व्यक्तीस पुण्याच्या येरवडा रुग्णालयात पाठवले जाते.यामध्ये येणारा आर्थिक खर्च उचलण्याची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार होत नाही.अनेक सामाजिक संस्था यात काम करत आहेत. मात्र त्यांना प्रशासन, सामान्य माणूस आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज आहे.
घाटी फक्त उपचार आणि रेफर करते
आमच्याकडे मनोरुग्ण विभागात येणार्या कुठल्याही रुग्णांना आम्ही फक्त तपासतो आणि खरोखर गरज वाटल्यास पुण्याच्या येरवड्याला जाण्यासाठी रेफर करतो. मग तो रुग्ण रस्त्यावरील जरी असला, तरीही आर्थिक खर्च करण्याची जबाबदारी आमच्यावर नाही. काही एनजीओ आहेत ज्या हे काम सामाजिक बांधिलकी म्हणून करतात.
- डॉ. प्रदीप देशमुख,
मनोविकृती विभाग घाटी.
समाज आणि प्रशासन दोघांचे मनोरुग्णांकडे दुर्लक्ष
मानसिक आजार कायदा आणि त्यामध्ये असणारे किचकट क्लोज यामुळे बरेचसे मनोरुग्ण आपल्याला रस्त्यावर दिसतात.लोकांची संवेदनशीलता संपलेली आहे. त्यामुळेच मनोरुग्ण आणि त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन अतिशय घाणेरडा आहे.मिळेल ते खाणे आणि उघड्यावर राहणे एवढेच त्यांच्या नशिबी आहे.
- डॉ. फारुक पटेल,
जीवन जागृती वैदयकीय आणि सामाजिक संस्था